महाराष्ट्रातील पुण्यातील (Pune) बिबवेवाडी (Bibwewadi) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. महिलेची लग्नाच्या नावावर फसवणूक झाल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. महिला डॉक्टरच्या जोडीदारावर लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. तब्बल 10 लाख रुपये घेऊन या व्यक्तीने तिला लग्नास नकार दिल्याने महिला डॉक्टरने आत्महत्या केली. महत्वाचे म्हणजे आरोपीचे आधीच लग्न झाले होते, मात्र त्याने ही बाब पिडीत महिला डॉक्टरपासून लपवून ठेवली. या मानसिक धक्क्यामुळे महिला डॉक्टरने क्लिनिकमध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.
अहवालानुसार, पल्लवी पोपट फडतरे असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. तिचे वय 25 वर्षे होते. कुलदीप आदिनाथ सावंत असे महिला डॉक्टरची फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कुलदीप सावंतविरुद्ध पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी विवाहित असूनही, आरोपीने जीवन साथी डॉट कॉम या वेबसाइटवर अविवाहित असल्याची बतावणी करून मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याकडून 10 लाख रुपये उकळले.
मात्र महिलेने लग्नाबद्दल विचारले तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. कालांतराने आरोपी कुलदीप सावंत याने आपण विवाहित असून आपली पत्नी गर्भवती असल्याचे महिला डॉक्टरला सांगितले. हा खुलासा झाल्यानंतर महिला डॉक्टरला धक्का बसला आणि ती ते सत्य पचवू शकली नाही. त्यानंतर तिने वारंवार आरोपीला 10 लाख रुपये परत करण्यास सांगितले, परंतु त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. यानंतर महिला मानसिकरीत्या अजूनच खचली. त्यानंतर पल्लवीने सुसाईड नोट लिहून तिच्या क्लिनिकमध्ये विषारी औषध प्राशन केले, त्यामुळे ती बेशुद्ध पडली. उपचारादरम्यान 8 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Wadala Sex Racket Case: मुलुंडमध्ये 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या; ब्लॅकमेल आणि आधारचा गैरवापर करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल)
महत्वाचे म्हणजे, जीवन साथी डॉट कॉमवर संपर्क साधल्यानंतर पल्लवीच्या वडिलांनी कुलदीपची देहू येथे भेट घेतली होती. पण त्याचे वागणे त्यांना योग्य वाटले नाही, म्हणून त्यांनी कुलदीपला नकार दिला होता. परंतु कुलदीपने वडिलांच्या नकळत पल्लवीशी संबंध जोडले होते. डॉक्टर म्हणून शिक्षण पूर्ण केलेली पल्लवी देहू रोड येथे क्लिनिक चालवत होती. बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांनी FPJ शी बोलताना सांगितले की, त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.