
जगभरात नावाजलेली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन (Pune International Marathon) स्पर्धा येत्या रविवारी (2 डिसेंबर) पुण्यात पार पडणार आहे. या मॅरेथॉनतर्फे देशभरातील, विविध क्षेत्रातील स्पर्धकांचे स्वागत करण्यास पुण्यनगरी सजली आहे. ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ ही पुणे शहरात दरवर्षी आयोजित केली जाणारी धावण्याची शर्यत आहे. ही मॅरेथॉन देशातील पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असून, ती पहिल्यांदा 1983 साली आयोजित केली गेली होती. हे या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे 33 वे वर्ष आहे. याचसोबत पुणे मॅरेथॉन परंपरेचे हे शताब्दी वर्ष आहे. 1918 साली पुण्यात पहिल्यांदा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावर्षीच्या मॅरेथॉनचे 'रन फॉर फिटनेस' हे घोषवाक्य असून, यंदा महिला पूर्ण मॅरेथॉनचाही यात समावेश करण्यात आला आहे. तब्बल आठ वर्षानंतर महिला गटातील ही 42.195 किलोमीटरची मॅरेथॉन होणार आहे.
या शर्यतीत अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूदेखील भाग घेतात. तसेच यात परदेशी नागरिकांचीही उपस्थिती लक्षवेधी असते. यावर्षी पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनसाठी 100 परदेशी खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला असून, आतापर्यंत या गटात 225 प्रवेशिका आल्या आहेत. महिला पूर्ण मॅरेथॉनलाही चांगला प्रतिसाद मिळत असून, यात 15 परदेशी महिला धावपटूंचा सहभाग निश्चित झाला आहे. यात इथिओपिया, केनिया, टांझानिया आणि इतर देशांच्या धावपटूंचा सहभाग आहे,
सारस बागेजवळील सणस क्रीडांगणापासून रविवारी, पुरुष आणि महिलांच्या मॅरेथॉनला पहाटे पाच वाजता सुरुवात होईल. त्यानंतर क्रमाक्रमाने पुरुष आणि महिला अर्ध मॅरेथॉन (21.098 किमी), 10 किलोमीटर शर्यत सुरू केली जाणार आहे.
या मॅरेथॉनसाठी विविध क्षेत्रात देशाचे नाव उंचावणाऱ्या पाच खेळाडूंची 'ब्रँड अॅम्बेसिडर' म्हणून निवड केली आहे. यात ट्रायअॅथलिट शुभम गांजळे, नॅशनल चॅम्पियन रॉक क्लायम्बर श्रेया नानकर, एव्हरेस्टवीर हर्षद राव, अल्ट्रामॅन एसपीएल आयजी कृष्ण प्रकाश, पॅरास्वीमर मुरलीकांत पेठकर यांचा समावेश आहे.
यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये एकूण तीस लाखांची पारितोषिके दिली जाणार आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मॅरेथॉनचे 'यू-ट्यूब'वर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही www.marathonpune.comया संकेतस्थळावर भेट देऊ शकता.