Pune Fruits, Flowers, and Vegetable Exhibition

सौंदर्य, उत्सव आणि नवचैतन्याचा हंगाम म्हणजे वसंत ऋतू (Spring Season). वसंत ऋतू हा हिवाळ्यानंतर आणि उन्हाळ्यापूर्वी येणारा आल्हाददायक ऋतू आहे. भारतात हा ऋतू फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान अनुभवला जातो. या काळात थंडी ओसरते, वातावरण सौम्य होते आणि निसर्ग बहरलेला दिसतो. झाडांना नवीन पालवी फुटते, फुले उमलतात आणि हवेत मधुर सुवास दरवळतो. उन्हाळ्याचे आगमन या फुलांमुळे शांत होते. आता निसर्गाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी,  महाराष्ट्रातील अनेक नागरी संस्थांचे उद्यान विभाग शहरांमध्ये पुष्प प्रदर्शने आयोजित करतात. आता पुणे महानगरपालिकेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण 43 वे फळे, फुले आणि भाजीपाला प्रदर्शन आयोजित करत आहेत.

प्रदर्शन तारीख, वेळ व ठिकाण-

हे प्रदर्शन शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 आणि रविवार, 16 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती संभाजी राजे गार्डन, जेएम रोड, शिवाजीनगर, पुणे येथे भरेल.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल, तर बक्षीस वितरण रविवार, 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. हे प्रदर्शन 15 तारखेला सकाळी 11 ते रात्री 8.30 आणि 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत खुले असेल. (हेही वाचा: Pune To Prayagraj Flight: महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या पुणेकरांसाठी खुशखबर! Akasa Air ने सुरु केली पुणे ते प्रयागराज उड्डाणे, जाणून घ्या वेळा)

जाणून घ्या काय असेल प्रदर्शनात-

प्रदर्शनात शोभेच्या वनस्पती, फळझाडांची मांडणी, गुलाब व हंगामी फुले आणि कलात्मक फुलांच्या सजावटीसह विविध प्रकारचे वनस्पती उपलब्ध असतील. बाग आणि वृक्ष संवर्धन उपक्रमांना समर्पित विशेष विभाग देखील बनवले जातील. पुणेकर फळे, फुले आणि भाज्यांवरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये एक विशेष निसर्ग आणि पर्यावरण-थीम असलेली छायाचित्रण स्पर्धा असेल.

पुणेकर विविध स्टॉलवरून शोभेच्या वनस्पती, फळझाडे आणि बागकाम साहित्य देखील खरेदी करू शकतात आणि स्टॉल लावण्याचे शुल्क 2,950 रुपये आहे, ज्यामध्ये भाडे आणि स्वच्छता शुल्क समाविष्ट आहे.

प्रवेश-

या प्रदर्शनासाठी प्रवेश शुल्क नाही, परंतु निर्धारित नमुन्यात प्रवेश पद्धतिका अनिवार्य आहे.

सहभाग इच्छुकांनी 9 फेब्रुवारी 2025 पूर्वी आपली नोंदणी करावी.