निसर्ग चक्रीवादळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई मध्ये  कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू; पोलिस आयुक्तांद्वारे आदेश जारी
Cyclone Nisarga Movement (Photo Credits: IMD)

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा आज रायगड (Raigad), पालघर (Palghar), मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) या भागांना बसण्याची शक्यता आहे. यामुळे वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी (Commissioner of Police) कलम 144 अंतर्गत संचारबंदीचा आदेश जारी केला आहे.

चक्रीवादळापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसंच आवश्यक कारणांसाठी घराबाहेर पडण्याची गरज भासल्यास हातोडी सारखे शस्त्र घेऊन बाहेर पडा. कारण त्यामुळे कारची काच तोडून बाहेर पडणे शक्य होईल, असा सावधानीचा इशाराही मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे. (Cyclone Nisarga Updates: निसर्ग चक्रीवादळ- मुंबई, महाराष्ट्रात काय तयारी? NDRF, रेल्वे आणि विमानसेवा यांची स्थिती काय?)

ANI Tweet:

निसर्ग चक्रीवादळामध्ये वार्‍याचा वेग हा 100-110 kmph ते 120kmph पर्यंत असेल. दरम्यान या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.  किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात  आलं आहे. तसंच नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून एनएडीआरएफच्या टीम्स चक्रीवादळाचा धोका असलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळ मुंबईत दुपारी 1 च्या सुमारास धडकेल, असा अंदाज आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.