'ब्राह्मण उमेदवाराला प्राधान्य,' रिअल इस्टेट डेव्हलपरच्या नोकरीची जाहिरात; Minister Jitendra Awhad यांनी उपस्थित केला 'हा' सवाल
Jitendra Awhad | (Photo Credits: Facebook)

देशाला स्वातंत्र्य मिळून आज कैक वर्षे लोटली आहेत. जग विविध क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे. मात्र अजूनही जातीयवादाचे (Racism) समूळ नष्ट झाले नाही. शिकले-सवरलेले लोकही जातीयवादाच्या पगड्यातून बाहेर निघू शकले नाहीत. नुकतेच याचे मोठे उदाहरण समोर आले आहे, जे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केले आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच रिअल इस्टेट डेव्हलपर ‘आराधना बिल्डर्स’ची एक जाहिरात शेअर केली आहे, ज्यामध्ये जातीवादाला खतपाणी घातले जात असल्याचे दिसत आहे.

आव्हाड यांनी ट्विटरवर सेल्स आणि मार्केटिंग पोस्टसाठी नोकरीच्या जाहिरातीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात कथितपणे या पदासाठी ब्राह्मण उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल असे नमूद केले आहे. हा फोटो शेअर केरात जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे की, ‘हा जाती भेद नाही का? आणि आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की आम्ही गुन्हेगार.’

यापूर्वी 2019 मध्ये, एका स्थानिक वृत्तपत्रात अशाच प्रकारच्या जातीवादी जाहिरातीसाठी चेन्नईस्थित इंटीरियर वर्क कंपनीला फटकारले होते. ‘महाव्यवस्थापक’: प्रकल्प, विक्री आणि प्रशासन या पदासाठीची जाहिरात होती, ज्यामध्ये कंसात ‘केवळ ब्राह्मण’ असे नमूद केले होते. या जाहिरातीबाबत बरीच टीका झाली होती. एका दिवसानंतर कंपनीने माफी मागितली आणि सांगितले की त्यांना 'केवळ ब्राह्मण' ऐवजी 'शुद्ध शाकाहारी' म्हणायचे आहे. (हेही वाचा: Selu Municipal Council: मालेगावचा वचपा सेलूत काढला, राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्षासह २० नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश)

दरम्यान, सध्या ठाण्यात राष्ट्रवादीचा ओबीसी मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली होती. सभेला संबोधित करताना, ओबीसींच्या जनगणनेच्या जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.