एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावरून नालासोपारा मतदार संघाचे उमेदवार?
Pradeep Sharma (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र पोलिस दलातून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप शर्मा( Pradeep Sharma) आता राजकारणात येण्याची तयारी करत आहे. प्राप्त माहितीनुसार प्रदीप शर्मा शिवबंधन बांधणार असून लवकरच नालासोपारा (Nala Sopara)  येथील विधानसभा मतदार संघातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याची शक्यता  आहे. सध्या त्यांच्या उमेदवारीवरून शिवसेनेमध्ये (Shiv Sena) जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप यावर कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच शिवसेनेकडूनही या वृत्ताला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

प्रदीप शर्मा यांच्या नावे सध्या 100 पेक्षा जास्त गुन्हेगारांचे एन्काऊंटर आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्याचा बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध या आरोपांमुळे 2008 साली प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने 2013 साली त्यांची मुक्तता केली. त्यानंतर प्रदीप शर्मा पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. 4 जुलै दिवशी प्रदीप शर्मा यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा; राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता

 प्रदीप शर्मा राजीनाम्यानंतर राजकारणात प्रवेश करू शकतात असे सांगितले जात आहे. मातोश्रीवर आज पालघर येथील पदाधिकार्‍यांची बैठक आहे. यामध्ये आगामी विधानसभा निवडणूकीसाठी चाचपणी सुरू असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे नालासोपारा येथील जागेसाठी प्रदीप शर्मा यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. श्रीनिवास वानगा आणि  प्रदीप शर्मा यांच्या उमेदवारीवर चर्चा होणार आहे. लोकसभेमध्ये श्रीनिवास वानगा यांना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे आता श्रीनिवास वानगा यांना विधानसभेचं तिकीट मिळणार का? हे आता ठरणार आहे.