
मुंबईमधील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर (Property Tax) माफ करण्याचे वचन शिवसेनेने दिले होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र त्यावर कॉंग्रेसने फक्त 11 टक्के मालमत्ता कर माफ होणार अशी आवई उठवली होती. या गोष्टीला भाजपने चांगलेच प्रत्युत्तर दिले. 2019-20 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची बिले अद्याप निघालेली नाहीत. नवीन वर्षात मालमत्ता कराची बीले तयार होतील, तेव्हा 500 चौरस फूटांच्या घरांना कोणताही मालत्ता कर लागणार नाही, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसने शिवसेना-भाजपवर टीका केली होती. त्यावर आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण दिले. विधानसभेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, कराचा अध्यादेश काढताना सेक्शन ए (क)मध्ये बदल झाला आहे. आता राज्य सरकार या कायद्यामध्ये बदल करणार आहे, सध्या ही प्रक्रिया चालू आहे. (हेही वाचा: 500 चौरस फूटांपर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, राज्य मंत्रिमंडळात 18 महत्त्वाचे निर्णय)
कायद्यात बदल झाल्यावर स्टेट एज्युकेशन सेस, ट्री सेस, एम्प्लॉयमेंट गॅंरेटी सेस हे तीन कर रद्द होतील. त्यामुळे फक्त 11 टक्केच नाही, तर संपूर्ण कर माफ होणार असल्याचे भाजपने सांगितले आहे.