दहा दिवस चाललेल्या या गणेशोत्सवाची सांगता आज होणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी तरुण मंडळे व पोलिस दलही सज्ज झाले आहे. मात्र गणपती विसर्जनादरम्यान डीजे लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी या निर्णयावर बहिष्कार घालण्यात आला. पुण्यातील काही राजकीय नेते मंडळी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि डीजे मालकांनी या निर्णयाविरोधात निदर्शने केली. पुण्यातील गणेश मंडळ आणि डीजे मालकांची शनिवारी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत डीजेवरील बंदी न उठविल्यास गणेशमुर्ती विसर्जन न करता जागेवरच गणपती ठेवणार असल्याची भूमिका मंडळांनी घेतली आहे.
‘न्यायालयामध्ये डीजेविषयी योग्य भूमिका मांडण्यास सरकार अपयशी ठरले, त्यामुळे न्यायालयाने या विसर्जन मिरवणुकीत देखील डीजेवर बंदी कायम ठेवली. न्यायलयाच्या या निर्णयाने आम्ही नाराज असून, आम्ही गणपती विसर्जन न करण्याचे ठरवले आहे. जोपर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत गणपतीची मुर्ती मंडपातच ठेवणार’ असा इशारा मंडळांनी दिला आहे.
नगर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक डीजेमुक्त व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षकांनी जिल्हाभर कंबर कसली आहे. मात्र डीजेसाठी आग्रह धरणार्या नगर शहरातील मानाच्या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला आहे. प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करून 14 मानाच्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढणार नाहीत, असे मंडळ पदाधिकार्यांनी रात्री उशिरा जाहीर केले.
उदयनराजेंच्या साताऱ्यातही हा डीजेवाद विकोपाला पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी काहीही झाले तरी साताऱ्यात डॉल्बी वाजणारच अशी भूमिका घेतलेले उदयनराजे न्यायालयाच्या निर्णयानंतरही आपल्या शब्दांवर ठाम आहेत. मात्र कोणी डॉल्बी वाजवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. आत्तापर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सव काळात 18 हजार 274 गुन्हेगारांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात उदयनराजेंचा हुकुम चालतो का न्यायालयाचा निर्णय हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.
आश्चर्य म्हणजे मुंबई शहरातील गणेश मंडळांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. न्यायालयानं डीजे आणि डॉल्बीवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढणार असल्याचा निर्णय मुंबई मधील मंडळांनी घेतला आहे.