येथील एका शाळेत काम करणाऱ्या सफाई कामगाराने दोन चिमुकल्या मुलींवर (चार वर्षे व सहा वर्षे) लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शाळेने व पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याची बाब देखील समोर आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदलापूर प्रकरणावर बोलावं, देशभरातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर बोलावं, अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. यावेळी पीएम मोदी यांनी बदलापूर आणि कोलकत्ता प्रकरणावर थेट पहिल्यांदा जळगावातून भाष्य केले. (हेही वाचा - Badlapur Sexual Assault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन महाविकासआघाडीची राज्यभर निदर्शने)
महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधम माफीस पात्र नाही. अशा घटनेतील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे. मी प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारला सागू इच्छितो की, महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य आहेत. कोणीही दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. कोणीही आरोपीला पाठीशी घालण्याचे प्रयत्न करु नये. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात दोषीला शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकार सुद्धा दोषीला शिक्षा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे असेल. असे भाष्य जळगावातून पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी राज्यभर निदर्शने करत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील व देशातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधूण्यासाठी, यावर मोदींनी भाष्य करावं या मागणीसाठी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आज सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर आंदोलन केलं.