नांदेड: 25 लाखांची रोकड आणि 74 तोळ्यांचे दागिने घेऊन 19 वर्षीय मुलीचे प्रियकरासोबत पलायन
Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामधील हणेगाव येथील एका मुलीने तब्बल 74 तोळ्यांचे दागिने आणि 25 लाखांची रोख रक्कम घेऊन प्रियकरासोबत पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचे वडील कापड व्यावसायिक आहेत. या मुलीचे तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्याच्याशी लग्न करण्यासाठी दागिने आणि रोखरक्कम चोरुन पळ काढला. याप्रकरणी मुलीचे वडील संजिवकुमार काशिनाथअप्पा अचारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसंच मुलाने मुलीचे धर्मांतरही केले असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

ही मुलगी 19 वर्षांची असून बारावी पास आहे. मोइनोद्दीन अत्तार असे तिच्या प्रियकराचे नाव असून तो दहावी नापास आहे. मोइनोद्दीन याने मुलीशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करुन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने त्याच्याशी लग्न करण्यासाठी घरातून चोरी करत पळ काढला. विशेष म्हणजे वडीलांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिस दिरंगाई करत होते. त्यानंतर न्यायालयात दाद मागून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (नववधू पळाली अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन, सॉफ्टवेयर इंजीनियर पती म्हणाला 'बायकोचे लग्नाआधीच होते अफेअर')

वफ्फ बोर्डात धर्मांतर करून निकाह केल्याचे फोटो आणि कागदपत्र व्हाट्सअॅपच्या माध्यमातून मुलाने मुलीच्या नातेवाईकांना पाठवले आहेत. त्याचबरोबर जबरदस्ती धर्मांतर केले गेले असल्याचे मेसेज मुलीने आपल्या पालकांना पाठवले आहेत. बळजबरी बुरखा घालून व्हिडिओ बनवला गेल्याचे मुलीने मेसेज करुन सांगितले आहे. दरम्यान, त्यानंतर मुलाकडच्या लोकांनी मुलींच्या वडीलांना मारहाण केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी नांदेड पोलिसांनी छापा मारून संबंधितांना ताब्यात घेतलं आहे. सध्या हणेगाव येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.