Mumbai Weather Update: राज्यभरात डिसेंबर महिन्यात वातावरणामध्ये बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातचं आता मुंबईकरांनी 4 डिसेंबरला 16 वर्षांतील डिसेंबर महिन्यातील सर्वात उष्ण दिवस अनुभवला. मुंबईत बुधवारी सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान 37.3 अंश सेल्सिअस नोंदवले. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार कुलाबा हवामान केंद्राने कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा किंचित कमी नोंदवले. यापूर्वी डिसेंबरमध्ये मुंबईत इतके उच्च तापमान 5 डिसेंबर 2008 रोजी नोंदवले गेले होते. त्यावेळी मुंबईत 37.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले.
मुंबईत 29 नोव्हेंबर रोजी किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे आठ वर्षांतील नोव्हेंबरचे सर्वात कमी तापमान आहे. बुधवारी सकाळी मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागात हलका पाऊस पडला. तसेच मंगळवारपासून ढगाळ आकाश होते. चक्रीवादळ फेंगलमुळे तयार झालेल्या आद्रतेमुळे वातावरणात मोठे बदल झाले आहेत. (हेही वाचा -Mumbai Weather Update: मुंबईचे हवामान आणि AQI घ्या जाणून; ठाणे, पालघरमध्ये तुरळक पावसाची शक्यता)
उत्तर आणि मध्य भारतात थंडी वाढण्याची शक्यता -
दरम्यान, हिमवृष्टी आणि पहाडांवर जोरदार वाऱ्याचा परिणाम दिल्लीत दिसून येत आहे. येथील हवा स्वच्छ झाल्याने थंडीही वाढली आहे. येत्या काही दिवसांत येथे धुके पडण्याची शक्यता आहे. डोंगरावर बर्फवृष्टी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत उत्तर आणि मध्य भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमान शून्य अंशांच्या खाली राहिले. मात्र, देशाच्या दक्षिण भागात अजूनही थंडी जाणवलेली नाही. फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये अजूनही दिसून येत आहे. त्यामुळे अनेक भागात पाऊस पडत आहे.
तथापी, उत्तर भारतात जोरदार वाऱ्यामुळे दिल्लीतील लोकांना दिलासा मिळाला आहे. दिल्लीची हवा पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली आहे आणि आता मध्यम श्रेणीत आली आहे. वाऱ्यामुळे प्रदूषणाचे कण विखुरले गेले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवार ते 7 डिसेंबरपर्यंत शहरात जोरदार वारे वाहण्याची अपेक्षा आहे.