मुंबई आणि ट्राफिक हे समीकरण तसं नवीन नाही पण कोरोना संकट काळात आता लॉकडाऊन शिथिल करताच पुन्हा वाहनांची वर्दळ वाढल्याने ट्राफिक जॅम होताना दिसत आहे. मुंबईकरांना विनाकारण 2 किमीच्या पलिकडे न जाण्याचं आवाहन आहे. परंतू काहींकडून त्या नियमांचं उल्लंघन होताना दिसत असल्याने पोलिसांनाही नाकेबंदी करत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलावा लागत आहे. आज (30 जून) नव्या आठवड्याच्या दुसर्या दिवशी देखील मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या आहेत. तशीच परिस्थिती मुलुंड चेक नाका आणि अन्य भागात दिसत आहे.
कोरोना संकटकाळात मुंबईमध्ये मिशन बिगिन अगेन अंतर्गत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही अंशी व्यवहार सुरू झाले आहेत. एमएमआर रिजनमध्ये प्रवासाला पास विना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यामुळे आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा झपाट्याने फैलावू शकतो या भीतीने आता मुंबई पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर 2 किमी परिसरापलिकडे न जाण्याचा नियम लादला आहे.
ANI Tweet
मुंबई: वेस्टर्न एक्सप्रेसवे पर लंबा ट्रैफिक जाम लगा। pic.twitter.com/gcSCijxLDR
— ANI_HindiNews (@AHindinews) June 30, 2020
मुंबई मध्ये धारावी, वरळी हे कोरोनाचे सुरूवातीच्या टप्प्यातील हॉट्सस्पॉट्स आता मुंबई उपनगरांमध्ये उत्तर दिशेला असणार्या भागांमध्ये पहायला मिळत आहेत. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी कालपासून नाकाबंदी कडक करण्यात आली आहे. काल नव्या नियमांनुसार सुमारे 16 हजारांपेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर पडणं, क्षमतेपेक्षा अधिक जण वाहनांमध्ये असणं, मास्कचा वापर टाळणं याकडे पोलिस कटाक्षाने नजर ठेवून आहेत.