Mumbai Rail Accident: पत्नीला भेटायला जाताना वेळ वाचावा म्हणून रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा शॉर्टकट घेतलेल्या तरूणाचा ट्रेनखाली येऊन मृत्यू; गोरेगावची घटना
Death (Photo Credits-Facebook)

मुंबई मध्ये गोरेगाव (Goregaon Station) येथे पत्नीला भेटण्यासाठी शॉर्टकटने गेलेल्या एका व्यक्तीला ट्रेनने उडवल्याची मनाला विषण्ण करणारी घटना समोर आली आहे. रिपोर्ट्स नुसार 30 वर्षीय व्यक्ती त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी रेल्वे ट्रॅक ओलांडून जात असताना त्याला ट्रेनने धक्का दिला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही घटना 6 सप्टेंबरची असून प्रतिक बिसेन असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती जीआरपी ने दिली आहे.

प्रतिक गोंदिया वरून आला होता. गोरेगाव मध्ये तो पत्नीला भेटण्यासाठी आला होता. त्याची पत्नी गोरेगाब मध्ये हॉस्पिटल मध्ये काम करते. प्रतिकच्या अपघाताचं वृत्त समजताच बोरिवली जीआरपी ने अ‍ॅक्सिडेंटल डेथ रिपोर्ट नोंदवला आहे. रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीमध्ये प्रतिकने फूट ओव्हर ब्रीज ऐवजी रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा निर्णय घेतला आणि घात झाला. FOB ऐवजी ट्रॅक ओलांडण्याचा निर्णय वेळेची बचत करणारा असेल असे त्याला वाटले पण दुर्देवाने त्यामध्ये त्याचा जीव गेला.

6 सप्टेंबरच्या संध्याकाळी 7 वाजताची ही घटना आहे. त्याला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले पण जबर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला. (नक्की वाचा: पालघर: बोईसर खैराफाटक येथे धावत्या ट्रेनखाली चिरडून एका महिलेसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू).

दरम्यान सप्टेंबरच्या एक तारखेलाच मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसच्या खाली येऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 3 महिला होत्या. ही घटना झारखंड मधील चक्रधरपूरच्या सिंघभूम येथील आहे. बॅंकेतून घरी परतताना हा प्रकार त्यांच्यासोबत झाला.