
BMC Heatwave Guidelines: मुंबई शहर, उपनगर आणि आसपासच्या शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेची तीव्रता (Mumbai Heatwave) झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सोमवारी शहरातील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी ( Heatwave Precautions) केली आहेत. त्याबाबतचे वृत्त पीटीआयने दिले आहे. मुंबई महानगरपालिकेने रहिवाशांना वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जास्त पाणी पिण्याचे आणि इतर खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
बीएमसीने सोमवारी संध्याकाळी उशिरा प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रहिवाशांसाठी 'काय करावे आणि काय करू नये' याची यादी दिली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या बृहन्मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट येत आहे. 'मार्च, एप्रिल महिन्यात अशा परिस्थिती वारंवार उद्भवू शकतात. उष्णतेच्या लाटेच्या वारंवार घटनांच्या पार्श्वभूमीवर, या काळात नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत,' असे अधिकृत नागरी संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
उष्माघाताची लक्षणे आढळल्यास उपाय
जर एखाद्या व्यक्तीला उष्माघाताची लक्षणे आढळली तर त्याला थंड ठिकाणी किंवा एखाद्या सावलीच्या ठिकाणी ठेवा. ज्यामुळे त्याच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी मदत होईल.
"त्याला/तिला ओल्या कापडाने पुसा. डोक्यावर पाणी ओता," असा सल्ला बीएमसीने नागरिकांना दिला आहे.
उष्माघाताने बाधीत व्यक्तीला ओआरएस (पाणी, साखर आणि इलेक्ट्रोलाइट्सचे मिश्रण), लिंबू पाणी किंवा शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करणारे इतर कोणतेही पेय द्या.
उष्माघाताने बाधीत व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात नेण्याची सूचना केली आहे. "वेळेवर उपचार न मिळाल्यास उष्माघात प्राणघातक ठरू शकतो".
उष्माघात टाळण्यासाठी, नागरिकांनी सुचवलेल्या टिप्स आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, असे बीएमसीने म्हटले आहे.
हायड्रेटेड रहा
बीएमसीने रहिवाशांना हायड्रेटेड राहण्यासाठी तहान नसली तरीही पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. हलके, सैल सुती कपडे घालणे, तीव्र सूर्यप्रकाश टाळण्यासाठी सनग्लासेस घालणे, छत्री बाळगण्याचा सल्ला दिला आहे
उष्णे पेय टाळा
उन्हाळ्यात उष्णे पेय टाळण्याचाही सल्ला यात देण्यात आला आहे. बीएमसीने सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, इतर उपायांसह अल्कोहोल, चहा, कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.