गेल्या काही दिवसांपासून मुंबई सह राज्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसून येत आहे. यासाठी शिथिल केलेले निर्बंध, सुरु केलेली लोकलसेवा आणि नागरिकांकडून नियम पाळण्यात होत असलेला बेजबाबदारपणा या गोष्टी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न देखील वारंवार उपस्थित केला जात आहे. काही दिवस आढावा घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज लोकलने (Local) प्रवास करत नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
किशोरी पेडणेकर यांनी भायखळा ते सीएसटीएम पर्यंत मुंबई लोकलने प्रवास करत सतर्क राहण्याचे महत्त्व समजावून देत नियम पाळण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी कोविड-19 नियमांचे पालन न केल्यास दुसरा लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी यापूर्वी दिला होता.
BMC Tweet:
.@mayor_mumbai किशोरी किशोर पेडणेकर यांनी सामान्य नागरिकांची समक्ष भेट घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याचे महत्व समजावून सांगितले व नियम पाळण्याबाबत सूचना दिल्या.#NaToCorona #MissionZero pic.twitter.com/bWgSxy36y5
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 17, 2021
नियम न पाळणाऱ्या 10 टक्के लोकांमुळे 90 टक्के लोकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जनजागृती करणे गरजेचे असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईसह राज्यातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोविड नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या एसओपीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.