Mumbai Goa Highway Road Accident: मुंबई गोवा हायवे वर लग्नासाठी निघालेल्या बसला अपघात
Accident | (Photo Credit: Archived, edited, representative images)

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) दोन अपघात झाले आहेत. यामध्ये एकूण 37 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.  त्यापैकी 15 जणांची स्थिती गंभीर आहे. परळ (Parel) वरून खेडकडे (Khed) निघालेल्या एका खाजगी बसचा अपघात झाला आहे तर दुसरा अपघात तवेरा गाडीचा झाला आहे.

परळ - खेड बस ही केळणे गावात एका लग्नासाठी जात होती. भरणे गोवळवाडी भागात जात असताना महामार्गाच्या कडेला खड्ड्यात जाऊन गाडी पलटी झाल्याने हा अपघात झाला आहे. भरणे नाक्याजवळ रिलायन्स पेट्रोल पंप जवळ ही बस सकाळी 6 च्या सुमारास पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीला धाव घेतली तर पोलिस प्रशासन देखील दाखल झाले आहे. दरम्यान यामध्ये 25 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडीया रिपोर्ट्सनुसार चालकाला डुलकी लागली आणि हा अपघात झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मुंबईवरून जयगड रत्नागिरी येथे निघालेल्या तवेरा कारला देखील अपघात झाला असून एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.