महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील निम्म्या भागामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नाही. महाराष्ट्रातील दुष्काळाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या २७ नोव्हेंबरला मनसेने औरंगाबाद शहरात दंडुका मोर्चाचे आयोजन केले आहे.
सुरुवातीला केवळ औरंगाबाद मध्ये आयोजित हा दंडुका मोर्चा हळूहळू राज्यव्यापी स्वरूप धारण करणार असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱयांनी सांगितले आहे. आज राजगडावर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत उपस्थित होते. महाराष्ट्रात 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; 112 तालुक्यांत गंभीर परिस्थिती
महाराष्ट्रातील ५ कोटी जनता भीषण दुष्काळात. तेव्हा सरकारकडे अशा स्थितीत नेमक्या कोणत्या उपाययोजना? दुष्काळ नियंत्रण विभाग अजून का नाही? दुष्काळी भागात रोजगाराच्या योजना का नाहीत? अशा अन्य अनेक मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला मनसेचा औरंगाबादमध्ये #दंडुकामोर्चा.#शेतकऱ्यांचीमनसे pic.twitter.com/P4t4c03fpk
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) November 15, 2018
खरीप हंगामाच्या मध्यावरच दुष्काळ पडणार असल्याचं ठाऊक असूनदेखील सरकार गप्प बसून राहिले आहे. सरकारच्या अशा धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचं मत माणसे नेत्यांनी व्यक्त केले आहे. शेतकऱयांच्या नुकसानानंतरही दुष्काळग्रस्त भागात रोजगाराच्या योजना नाहीत, दुष्काळ नियंत्रण विभाग नाही असे मनसेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ढिम्म बसलेल्या सरकारला जागं करण्यासाठी हा दंडुका मोर्चा असल्याचं म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये आयोजित दंडुका मोर्चामध्ये सुमारे २५,००० शेतकरी सहभाग घेणार असल्याचा दावादेखील मनसेकडून करण्यात आला आहे.