मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मिलिंद देवरा यांची नियुक्ती; संजय निरुपम यांना उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून उमेदवारी
Sanjay Nirupam - Milind Deora (Photo Credits: IANS)

येणाऱ्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून एक मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदा (Mumbai Congress President) वरुन संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांना हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी मिलिंद देवरा (Milind Deora) यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम यांना पक्षातून मोठा विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. तसेच संजय निरुपम लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. पक्षाकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कॉंग्रेसने संजय निरुपम यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र मुंबई पश्चिमेच्या जागेवरच निवडणूक लढवण्यावर संजय निरुपम हटून बसले आणि त्यांना देऊ केलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते तयार नव्हते. अशा गोष्टींमुळे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असे देवरा यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना कळवले होते. मिलिंद देवरा हे माजी खासदार राहिले असून दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडून आले होते. 2004च्या निवडणुकीत निवडून आलेले ते सर्वांत तरुण खासदार होते.

मात्र मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यामध्ये मुंबईच्या शहरप्रमुख पदावरून अनेक वर्षांपासून वाद होते. ‘मला बाह्या सरसावून हमरीतुमरीवर येणं मान्य नाही. असे वाद काँग्रेसमध्ये होत नाहीत. याबद्दल आता पक्षाचे वरीष्ठच निर्णय घेतील.’ असे देवरा म्हणाले होते. त्यानुसार मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी मिलिंद देवरा यांचे निवड झाली आहे.