इतके दिवस आवाज उठवून, राज्यभरात लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन; मोर्चा काढूनही सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अजून कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे आता दिवाळीनंतर 16 ते 26 नोव्हेंबरदरम्यान राज्यात मराठा संवाद यात्रा काढण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली आहे. शेवटच्या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी या मराठा संवाद यात्रेचा मोर्चा विधिमंडळाच्या अधिवेशनावर चालून जाणार आहे.
राज्य सरकराने 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र या आश्वासनांची पूर्तता होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात मराठा संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनंतर राज्यातील प्रत्येक गावात ही संवाद यात्रा निघणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
सरकारने मराठा आरक्षण जाहीर करण्यासह आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे तसेच कोपर्डी प्रकरणाचा निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व महिलांना संरक्षण द्यावे अशा मागण्याही मराठा समाजाकडून करण्यात आल्या आहेत.