
मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आम्ही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या भावना पत्राद्वारे राष्ट्रपतींना पोहोचवल्या आहेत. केवळ राष्ट्रपतीच नव्हे तर यापुढे वेळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार आहोत, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची पूर्वनियोजीत वेळेनुसार आज (11 मे 2021) सायंकाळी पाचच्या सुमारास राजभवन येथे भेट घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र सरकारने या आधी केलेला मराठा आरक्षणाचा कायदा जर 'फुलप्रुफ' असता तर तो सर्वोच्च न्यायालयात टीकला असता, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगाला. दरम्यान, मराठा समाज हा अत्यंत समजदार आणि सोशिक आहे. त्यामुळे या समाजाने सरकारच्या भावना समजून घेतल्या आहेत. या समाजाचे आरक्षण टीकावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात यश आले नाही. परंतू, या समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. त्यामुळे आम्ही आमच्या भावना राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींना पोहोचवल्या आहेत. याशिवाय आरक्षणासंदर्भात काही सहकार्य लागल्यास कर्तव्याच्या भावनेतून तेही करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Maratha Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण मराठा आरक्षण प्रकरणी आज घेणार राज्यपालांची भेट)
सर्वोच न्यायालयाने महाराष्ट्र सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा रद्द ठरवला. त्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न सर्वांच्याच समोर उभा ठाकला आहे. या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी संभाव्य पर्यायांचा विचार करुन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे कालच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आज राजभवन येथे ही भेट पार पडली.