Maharashtra Assembly Elections 2019 Dates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तारखा 19, 20 सप्टेंबर दिवशी जाहीर होण्याची शक्यता; केंद्रीय निवडणूक आयोगाचे त्रिसदस्यीय मंडळ राज्यात घेणार आढावा
Elections (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2019) आता सारेच पक्ष तयारीला लागले आहे. महाराष्ट्रात अद्याप या निवडणूकांसाठी तारखा जाहीर झालेल्या नाहीत मात्र या आठवड्याच्या शेवटापर्यंत विधानसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या 17 आणि 18 सप्टेंबर या दोन दिवशी निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आपल्या खास अधिकार्‍यांसोबत रिव्ह्यू मिटिंग घेणार आहेत. पुढील 2 दिवसांच्या भेटी गाठी आणि मिटिंगनंतरच तारखा जाहीर केल्या जातील अशी माहिती हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये देण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये 40% नागरिक पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक 2019 पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल.

हिंदुस्तान टाईम्सला एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार (19 सप्टेंबर) किंवा शुक्रवार (20 सप्टेंबर)पर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर होऊ शकतात. 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि मतमोजणीसाठी सुमारे 35 दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. तसेच दिवाळीपूर्वी निवडणूकांचे काम पूर्ण करायचे आहे. यंदा दिवाळी 27 ऑक्टोबर दिवशी आहे.' असे त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र दौर्‍यावर सध्या निवडणूक आयोगाचं 3 सदस्यांचं एक मंडळ आलं आहे. यामध्ये चीफ इलेक्शन कमिशनर सुनिल अरोरा यांचादेखील सहभाग आहे. मंगळवारी संध्याकाळी ते राज्य निवडनूक आयोगाची भेट घेणार आहेत. यामध्ये पोलिस अधिकारी, केंद्रीय विभागाचे अधिकारी यांचा समावेश असेल.

महाराष्ट्रातील 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ यंदा 9 नोव्हेंबर दिवशी संपणार आहे. महाराष्ट्रासोबतच हरियाणा अअणि झारखंड राज्यामध्येही विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यांच्या तारखादेखील लवकरच जाहीर केल्या जातील.