महाराष्ट्रात (Maharashtra) आज 522 नवीन कोरोना विषाणू (Coronavirus) पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत व राज्यात 27 मृत्यूची नोंद झाली आहे. अशा प्रकारे राज्यात एकूण कोरोना व्हायरस पॉझिटिव्हची संख्या 8590 वर पोहोचली आहे. या संकटकाळात लॉक डाऊन चालू आहे, मात्र रुग्ण संख्या वाढतच आहे. अशात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या विषाणूविरुद्धच्या लढाईबाबत राज्याच्या सिद्धतेबद्दल माहिती दिली. राज्यात कोरोना व्हायरससाठी 1677 तीन श्रेणीतील उपचार रुग्णालये असून, निगा केंद्रेही स्थापन केली गेली आहेत. यामध्ये 1 लाख 76 हजार 347 विलगीकरण, तर 7248 अतिदक्षता (ICU) खाटांची उपलब्धता आहे.
राजेश टोपे यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या तीन हजार व्हेंटिलेटर्स, 80 हजाराच्या आसपास पीपीई किट्स, तर 2 लाख 82 हजार एन 95 मास्क उपलब्ध आहेत. राज्यामध्ये असलेल्या 1677 रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित रुग्णांसाठी 62 हजार 640, तर कोरोना बाधितांसाठी 1 लाख 13 हजार 707 विलगीकरण बेड्सची सोय करण्यात आली आहे. या तीनही श्रेणीतील रुग्णालयांसाठी खाटांची, पीपीई किटस् तसेच व्हेंटिलेटर्सची संख्या पुरेशी आहे.
श्रेणी 2 मध्ये 517 रुग्णालय व निगा केंद्र कार्यरत आहेत. त्यात अतिदक्षता विभागातील खाटा मिळून सुमारे 31 हजार विलगीकरण बेड्स उपलब्ध आहेत. श्रेणी 3 मध्ये 914 निगा केंद्र कार्यरत असून, त्यात 1 लाख 20 हजार 611 विलगीकरण खाटा आहेत. कोरोना बाधित गंभीर रुग्णांवर श्रेणी 1 च्या रुग्णालयात उपचार केले जातात, ज्यांना सोम्य लक्षणे आहेत त्यांच्यावर श्रेणी 2 वर, तर ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळली नाहीत अशांवर श्रेणी 3 मध्ये उपचार केले जातात. (हेही वाचा: महाराष्ट्रात आज 522 नवीन कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण संक्रमितांची संख्या 8590 वर)
तर अशा प्रकारे रुग्णालये आणि खाटांच्या व्यवस्थेसह महाराष्ट्र कोरोनाशी लढण्यास सज्ज आहे. दुसरीकडे या संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना, मे व जून महिन्यांसाठी प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 78 लाख रुपयांचा दंड वसूल केला गेला आहे. 100 नंबर वर आलेल्या 78 हजार 474 कॉल्सची योग्य दखल घेतली गेली आहे, तर क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या 610 व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात भरती केले गेले.