Maharashtra Rain: महाराष्ट्रात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी
Mumbai Rains |(Representative Image/ANI)

महाराष्ट्रात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 65 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एका अहवालात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये हे मृत्यू झाले आहेत, ज्यामध्ये रस्ते अपघात, पुलावरून पडणे, बुडणे, वीज कोसळणे आणि आग लागणे यांचा समावेश आहे. या कालावधीत सहा गुरांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, असे त्यात म्हटले आहे. यासह गेल्या 24 तासांत नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे संपूर्ण राज्यात सक्रिय पाऊस पडला, ज्यामुळे अनेक भागात पाणी साचले, असेही अहवालात म्हटले आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांसारख्या विविध ठिकाणी गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

महाराष्ट्रात 2025 च्या पावसाळ्याने जोरदार हजेरी लावली असून, यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मे 2025 मध्ये दक्षिण-पश्चिम मान्सूनने लवकर प्रवेश केला, ज्यामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडला. यंदाच्या मुसळधार पावसाने शेतीसाठी सकारात्मक परिणाम केले असले, तरी अनेक शहरी आणि ग्रामीण भागांत अडचणी निर्माण झाल्या. (हेही वाचा: Mumbai-Thane Traffic Update: मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प, गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ रस्ता खचला)

दरम्यान, महाराष्ट्रात मान्सून सामान्यतः 1 जूनच्या आसपास प्रवेश करतो, परंतु यंदा तो लवकर आला. गेल्या 10 वर्षांत, 2019 आणि 2020 मध्येही सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडला, ज्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना दिलासा मिळाला.  अहवालानुसार, मान्सून पुढील 3 दिवसांत गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत पसरेल. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या गाड्या 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 04:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).