राज्यातील कंत्राटी भरतीवरून महाविकासआघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. कंत्राटी भरतीचं पाप काँग्रेस-राष्ट्रवादीचं असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी टीका केली होती. दरम्यान, बावनकुळेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून चांगलाच समाचार घेण्यात आला होता. यानंतर भाजपने देखील शरद पवारांवर टिका केली आहे. (हेही वाचा - माजी मंत्री रविंद्र वायकर मुंबई पोलिसांच्या Economic Offences Wing मध्ये चौकशीसाठी दाखल)

फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो शरद पवार यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं. अशी टिका भाजपाने आपल्या ट्विटर अकाउंट वरुन केली आहे.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन तुम्ही कायम त्यांच्याविचारांविरोधात भूमिका घेतल्या. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आलात त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली हा इतिहास आहे. विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांना विरोध करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या समोर गुडघे टेकून मुजरा केला. त्यामुळे स्वाभिमानाची भाषा तुम्हाला शोभत नाही.असे देखील भाजपने आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे.