महाराष्ट्रात दिवसागणिक वाढणार्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्याला रोखण्यासाठी आता राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान आज (18 मे) दिवशी महाराष्ट्रात COVID 19 विरूद्ध लढण्यासाठी 'आयुष' उपचार पद्धतीने रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले जाऊ शकतात याकरिता विशेष टास्क फोर्स बनवण्यात आले आहे. अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाकडून देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून मुंबई पोलिसांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कॅम्फोर 1 एम (Camphora 1m) आणि आर्सेनिक अल्ब 30 (Arsenicum Album 30) ही औषधं सुरू करण्यात आली आहेत. आता यामध्ये अजून सक्षमपणे काम करण्यासाठी विशेष टास्क फोर्स काम करणार आहे.
दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग साधना सोबतच आयुर्वेदीक उपचार, होमिओपॅथी, युनानी कशा प्रकारे मदत करू शकते हे पाहिलं जाणार आहे. डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 17 जणांची समिती यासाठी काम करेल. डॉ. लहाने या समितीचे अध्यक्ष असतील अशी माहिती देण्यात आली आहे. अॅलोपॅथीच्या सोबतीने पर्यायी उपचार पद्धतीने रूग्नांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढवता येऊ शकते का? यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. अद्याप जगभरात कोव्हिड 19 विरुद्ध लढण्यासाठी कोणतीही ठोस उपचारपद्धती नाही. औषध आणि लस यांच्याबाबत अद्यापही शोध सुरू आहे.
The GoM has approved the formation of Task Force on AYUSH for #COVID19
This task force will give recommendations to the government to incorporate AYUSH treatment modalities specifically for increasing immunity against #COVID19. pic.twitter.com/343QyZO1uJ
— Medical Education & Drugs Department, Maharashtra (@Maha_MEDD) May 18, 2020
महाराष्ट्रामध्ये काल सर्वाधिक 2347 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 33 हजार 53 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 हजार 688 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल सर्वाधिक 600 जण एकाच दिवशी डिस्चार्ज करण्यात आले आहेत. वाढती रूग्णसंख्या पाहता महाराष्ट्रासह मुंबईतील अनेक रूग्णालयांवर ताण आला आहे. मात्र त्याला पर्याय म्हणून मुंबईतील अनेक मोकळ्या मैदानांवर आजपासून तात्पुरती कोव्हिड सेंटर्स उभारून खुली करण्यात आली आहेत.