Chandrakant Patil And Uddhav Thackeray (Photo Credit: Facebook)

धारावीतील (Dharavi) कोरोना प्रसार रोखण्यात यश आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने धारावी पॅटर्नचे कौतुक केले आहे. त्यानंतर धारावीतील करोना प्रसार रोखण्यावरून आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. धारावीत झालेल्या कोरोना नियंत्रणाचे सगळे श्रेय सरकारने घेण्याची गरज नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारने केवळ भ्रष्टाचार केला,” असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला केला आहे.

महापालिका प्रशासन, राज्य सरकार आणि आरएसएस यांच्यात श्रेयवादावरून कलगितुरा जुंपल्याचे बघायला मिळत आहे. या श्रेयवादावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ज्या गोष्टी कौतुकाच्या आहेत, त्याचे कौतुक केले पाहिजे. पण चुकीच्या गोष्टींवर टीका करायची नाही का? भारतातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी कोरोनाचा केंद्र बिंदू ठरली होती. पण धारावीने कोरोनावर मात केली आहे. पण यांचे श्रेय सरकारचे नसून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून केलेल्या स्क्रिनिंगचे आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सरकारने केवळ भ्रष्टाचार केला आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कोरोना संंबधित चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह; राजभवनात 18 कोरोना रुग्ण आढळल्यावर दिली माहिती

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असे बिरुद मिरवणाऱ्या धारावीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले होते. मात्र, गेल्या काही दिवासांपासून या भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. धारावीत शनिवारी 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 370 वर पोहचली आहे.