महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली सह कोकणातील काही भागांमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे अनेक गावांना पूराच्या पाण्याचा वेढा पडला होता. या परिस्थितीमुळे अनेक गावांमधील शेती, घरं, दुभती जनावरं यांचं नुकसान झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरामुळे बेघर झालेल्या अनेकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी मराठी कलाकारांनी आवाहन केलं होतं. त्यानुसार नागरिकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता मदतीच्या सामानांचे ट्रक पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी रवाना झाले आहेत.
मुंबईतील काशिनाथ नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सह काही ठराविक ठिकाणी नागरिकांना आवश्यक वस्तू मदत म्हणून देण्यासाठी आवाहन केले होते. या मदतीच्या आवाहनानंतर जमा झालेल्या वस्तूंचे प्रति कुटुंब काय गरज असेल? हा विचार करून विभागणी करण्यात आली. त्यानुसार खास पॅकेज बनवण्यात आले आहेत. आता ही पॅकेजेस पूरग्रस्तांसाठी रवाना झाली आहेत.
सुबोध भावे ट्वीट
ऊद्या सकाळी ६ वाजता मुंबईहून आणि १० वाजता पुण्याहून सर्व सामान आपल्या माणसांसाठी सांगली,कोल्हापूर आणि कोकण साठी रवाना होईल.
तिकडे चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषदेच्या सदस्यांकडून आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने याचं वाटप होईल#marathikalakarwithmaharashtra . pic.twitter.com/aqD3WGqmqp
— सुबोध भावे (@subodhbhave) August 15, 2019
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने फेसबुकच्या माध्यमातून हा मदतीचा हात पुढे करत साऱ्यांनाच सहकार्य करण्याचे आवाहनही केले होते. कलाकार संतोष जुवेकर, सुबोध भावे, जीतेंद्र जोशी यांच्यासह बॅकस्टेज कलाकार, तंत्रज्ञ यांनी स्वतः जातीने या मदत कार्यामध्ये पॅकेजिंगचं काम पूर्ण केले.
कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात पूराच्या वेढ्यात असलेल्या सुमारे अडीज लाखाहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. प्रशासनाकडून बेघरांच्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे.