Nawab Malik, Ajit Pawar (Photo Credit- Facebook)

सध्या विधानसभेसाठी महाराष्ट्रातील (Maharashtra Assembly Elections 2024) सत्ताधारी महायुतीतील सर्व घटक पक्ष आपल्या मित्रपक्षांच्या समर्थनार्थ प्रचार करत असताना दिसत आहे. मात्र यामध्ये अजित पवारांचे भाजपशी सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्याशी युती करण्यावरून भाजप-आरएसएसमध्ये टीकेची झोड उठली होती. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे’, या घोषणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत प्रचार करणार नसल्याचेही बोलले जात आहे. यासह अजित पवार नवाब मलिक यांचा प्रचार करताना दिसत आहेत.

अशात राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते आणि मानखुर्द नगर मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर निवडणूक प्रचारात करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे अजित गटाचे उमेदवार असूनही भाजपने नवाब मलिक यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला नसल्याची माहिती आहे. आता प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात मलिक म्हणाले, आम्ही आमच्या प्रचारात पंतप्रधान मोदींचा फोटो वापरणार नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपच्या विरोधात जाऊन गुरुवारी मलिक यांच्या मतदारसंघातून त्यांच्या पक्षाच्या मुंबई निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्यानंतर मलिक यांचे हे वक्तव्य आले आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections: 'शरद पवार साहेब, तुमच्या चार पिढ्याही जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत आणू शकत नाहीत'- Amit Shah)

मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघ, जिथून नवाब मलिक उमेदवार आहेत, ती सध्या राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली जागा बनली आहे. येथे नवाब मलिक यांची अबू आझमीशी स्पर्धा आहे. अबू आझमी हे समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष असल्याची माहिती आहे. ते या जागेचे विद्यमान आमदारही आहेत. आझमी 2009, 2014 आणि 2019 मध्ये तीन वेळा या जागेवरून आमदार म्हणून निवडून आले आहेत. पवार यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या निवडणुकीत मानखुर्द-शिवाजीनगर, अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व, कळवा-मुंब्रा आणि कागल मतदारसंघात पाच मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत.