Maharashtra Assembly Election 2019: ईव्हीएमवरील कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळालाच! साताऱ्यातील नवलेवाडी गावातील धक्कादायक प्रकार
Technical fault in EVM (Photo Credit - PTI)

सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2019) राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. पंरतु, साताऱ्यातील कोरेगाव मतदारसंघातील नवलेवाडी (Navlewadi) गावातील मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये घोळ (Technical Fault in EVM) असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या केंद्रावरील ईव्हीएमवरील कोणतेही बटण दाबले तरी मत ‘कमळ’ या चिन्हालाच जात असल्याची बाब समोर आली आहे. हा सर्व प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांनी सत्यता तपासून ईव्हीएम मशीन बदलले. त्यानंतर पुढील मतदानाची प्रक्रिया पार पडली.

सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर येथील ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आला. मतदान केंद्रावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तेथील नागरिकांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला. ईव्हीएममध्ये घोळ असल्याच्या तक्रारी वाढल्याने 11 वाजताच्या सुमारास ईव्हीएम मशीन बदलण्यात आले. परंतु, तोपर्यंत सुमारे 290 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

हेही वाचा - Maharashtra Assembly Polls: या 3 निवडणुकीत चुकला होता एक्झिट पोलचा अंदाज, जाणून घ्या सविस्तर माहिती 

या सर्व प्रकारामुळे नवलेवाडी गावातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामस्थांच्या मते, मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनदेखील त्यांनी या प्रकाराची दखल घेतली नाही. तसेच ईव्हीएम बदलण्याच्या अगोदर झालेल्या मतदानाचे काय करणार? याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. या धक्कादायक घटनेनंतर निवडणूक आयोग कोणती कार्यवाही करणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.