शिवसेना-भाजप युती 100 टक्के होणारच पण, कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही: चंद्रकांत पाटील
Chandrakant Patil | (Photo credit : Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे जागावाटप हा आता राजकीय विनोदाचा विषय ठरु लागला आहे. युतीबाबत दोन्ही पक्षाचे नेते ठाम आहेत. परंतू, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी विधाने येत आहेत. भाजपाची निवडणूक समितीची बैठक आज (शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019) पार पडली. या बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्य, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक मत्त्वपूर्ण विधान केले आहे. 100 टक्के युती होणारच मात्र, युतीचा अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे निर्णय घेतली, असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या इतरही काही नेत्यांनी शिवसेना युतीबाबत विविध विधाने केली आहेत. तर, दुसऱ्या बाजूला संजय राऊत, दिवाकर रावते यांच्यासह इतरही काही शिवसेना नेत्यांनी युती आणि जागावापटपाबाबत विधाने केली आहेत. या पार्श्वभूमिवर युतीत नेमके चाललंय तरी काय अशी चर्चा रंगली आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते युतीचा निर्णय संयुक्तरित्या आपणच घेऊ असे सांगत असतानाही दोन्ही बाजूकडील नेते परस्परविरोधी विधाने करताना दिसत आहेत. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: कोणत्याच पक्षाला मिळणार नाही बहुमत, यंदा बनणार NDA चं सरकार, शिवसेनेच्या संजय राऊत यांचा ठाम विश्वास)

गृहमंत्री तसेच, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे येत्या 22 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या वेळी संयुक्तरित्या विधानसभा निवडणूक प्रचाराची संयुक्तरित्या घोषणा केली जाण्याची तसेच, शिवसेना (Shiv Sena), भाजप (BJP) आणि मित्रपक्ष प्रत्येकी किती जागा लढवणार याबाबतही माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आजघडीला महायूतीत शिवसेना 126, भाजप आणि मित्रपक्ष 162 असे जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. अर्थात या वृत्ताला भाजप अथवा शिवसेना या दोन्ही पक्षांनी अधिकृत दुजोरा दिला नाही.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवसस्थान 'मातोश्री' येथे शिवसेना नेते आणि मंत्र्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.  दरम्यान, या बैठकीला जात असताना शिवसेना नेते अनिल देसाई यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता शिवसेना-भाजप आणि मित्रपक्ष यांच्यात महायुती 100% होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा होईल का असे विचारले असता, 'आजची बैठक ही विधानसभा निवडणूक तयारीचा पूर्वभाग म्हणून बोलावण्यात आली' असल्याचे सांगत देसाई यांनी मूळ प्रश्नाला बगल दिली.