देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. दिवसागणित वाढणारी कोरोना बाधितांची संख्या चिंतेत भर घालत आहे. अशातच एक आशादायी बातमी समोर येत आहे. राज्यातील एका 106 वर्षांच्या कोरोनाग्रस्त आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आनंदीबाई पाटील (Anandibai Patil) असे या आजींचे नाव असून त्यांना आज (20 सप्टेंबर) सावळाराम (Savlaram) या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधून (KDMC COVID Hospital) डिस्चार्ज देण्यात आला. अशी माहिती एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिली असून त्यांच्या डिस्चार्ज कार्ड सोबतचा फोटोही शेअर केला आहे. या फोटोतील आजींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला उभारी देणारा आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी कोरोनामुक्तीचा प्रवास यशस्वीपणे पार पाडला आहे. जालना येथील 107 वर्षांच्या आजींनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली होती. त्यांच्यासोबत त्यांची 78 वर्षांची मुलगीही कोरोनामुक्त झाली होती. तर यापूर्वी एका 92 वर्षांच्या आजींनी देखील कोरोनावर मात करत केडीएमसीच्या पालिका रुग्णालयातून डिस्चार्ज मिळवला होता. ज्येष्ठ नागरिकांच्या या कोरोना विरुद्धच्या यशस्वी प्रवासामुळे चिंतेच्या वातावरणातही एक सकारात्मकता येते.
ANI Tweet:
Maharashtra: A 106-year-old woman Anandibai Patil discharged today after recovery from Savlaram Kalyan-Dombivli Municipal Corporation (KDMC) COVID Hospital. pic.twitter.com/aEkRIjqAME
— ANI (@ANI) September 20, 2020
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना विरुद्ध मानवी जातीचे युद्ध सुरु आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गात वृद्ध व्यक्ती, लहान मुलं यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव दहशत निर्माण करत असला तरी आपली दांडगी इच्छाशक्ती त्याविरुद्धचा लढा यशस्वी करते, हे आनंदीबाई पाटील या आजींसारख्या अनेक उदाहरणातून समोर आले आहे. तसंच आरोग्य यंत्रणाची तत्परता, मेहनत यामुळे देशासह राज्यातील अनेक लहान मुलांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र यात कोणतीही गाफीलता कामी येणार नाही. तर नियमांचे पालन करणे, खबरदारी घेणे आणि सकारात्मता यामुळे कोविड विरुद्धची झुंज यशस्वी ठरु शकेल.