खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiyaz Jaleel) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय कामात अडथळा तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन अशा विविध आरोपांखाली जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लॉकडाऊन काळात सील केलेल्या दुकानांवरील कारवाई मागे घ्यावी अशी मागणी करत इम्तियाज जलील यांनी कामगार आयुक्तालयाला भेट दिली होती. या वेळी कामगार उपायुक्तांसोबत जलील (Imtiyaz Jaleel) यांचा खटका उडाला. जलील यांनी उपायुक्तांसोबत आरेरावी केली. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर त्यांनी महिला कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केले, असा जलील यांच्यावर आरोप आहे.
खासदार इम्तियाज जलील हे कामगार उपायुक्तांसोबत आरेरावी करत असताना उपस्थित महिला पोलीस कर्तव्याचा भाग म्हणून या प्रकाराचे व्हिडिओ चित्रिकरण करत होती. या चित्रिकरणास विरोध करत खासदार जलील यांनी महिला पोलीसाच्या हाताला धक्का मारुन त्यांचा मोबाईल खाली पाडला. याशिवाय या महिला पोलिसासोबत उद्धट वर्तनही केले, अशी तक्रार कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली आहे. उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी स्वत: ही तक्रार क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिली आहे. उपायुक्तांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर 25 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे या मुख्य आरोपासह इतरही विविध कलमांखाली या 25 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
इम्तियाज जलील यांच्यासह 25 जणांवर दाखल गुन्हे
- कलम 353- सरकारी कामात हस्तक्षेप, लोकसेवकाला कर्तव्य पार पाडण्यापासून बलप्रयोगाने रोखणे
- कलम 332- लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे
- कलम 188- लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा
- कलम 269- जीवितास धोकादायक रोगाचा संसर्ग पसरविण्याच्या संभवाची हयगयीची कृती
इम्तियाज जलील फेसबुक पोस्ट
काय घडले नेमके?
लॉकडाऊन काळात सील केलेल्या 66 दुकानांबाबत कामगार उपायुक्त कार्यालयात मंगळवारी सुनावणी सुरु होती. कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या दालनात सुनावणी सुरु होती. दरम्यान, खासदार इम्तियाज जलील हे 24 दुकानदारांना घेऊन तेथे दाखल झाले. या वेळी खासदार इम्तियाज जलील यांनी उपायुक्तांना 'सील केलेल्या दुकानांवरील कारवाई मागे कधी घेणार हे सांग. तू कलेल्टरची हुजरेगीरी करतो आहेस. आताच सांग किती दंड आकारणार आहेस. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत या दुकानदारांना काय दिले?', असे विविध प्रश्न विचारत आणि एकेरी उल्लेख करत सुनावणीदरम्यान अडथळा आणला. तसेच, शासकीय कामातही अडथळा आणल्याचे सांगत उपायुक्त शैलेंद्र पोळ यांनी तक्रार दाखल केली आहे.