Landslide Incidents During Monsoon: पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबईकरांना मिळणार दिलासा; डोंगराला बसवण्यात येणार सेफ्टी नेट

मुख्यमंत्री म्हणाले की, ज्याप्रमाणे मुंबई–पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे.

Landslide Incidents During Monsoon: पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुंबईकरांना मिळणार दिलासा; डोंगराला बसवण्यात येणार सेफ्टी नेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Landslide Incidents During Monsoon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी घाटकोपर भागातील असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी भागाला भेट दिली आणि त्याठिकाणी डोंगराला बसविण्यात येत असलेल्या सेफ्टी नेटची आणि इतर संरक्षणात्मक उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

मुंबई शहरातील दरडप्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे, हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. याचबरोबर म्हाडा, महानगरपालिका, एमआयडीसी यासह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरात आणण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यापूर्वी महानगरपालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा मुंबईतील दरड प्रवण क्षेत्राचा सर्व्हे करण्यास सांगितले होते. त्यानुसार, मुंबईमध्ये एकूण ३१ दरड प्रवण क्षेत्र आहेत. त्यातील आज असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी येथे सेफ्टी नेट बसवण्यात येत असलेल्या कामाची पाहणी केली. हे काम अतिशय अत्याधुनिक पद्धतीने करण्यात येत आहे. मुंबईत सर्व ३१ ठिकाणी हे काम सुरू आहे. कोणत्याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू नये हे आमचे लक्ष्य आहे. दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई आम्हाला बनवायची आहे. त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (हेही वाचा: Pune: पुणे महापालिकेने एफसी रोडवरील L3 बारमधील अनधिकृत बांधकामावर चालवला हातोडा; ड्रग पार्टी झाल्याचा आरोप)

मुख्यमंत्री म्हणाले की, ज्याप्रमाणे मुंबई–पुणे एक्स्प्रेस महामार्गावर सेफ्टी नेट बसवल्या, तशाच इथे बसवल्या जात आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांना अधिक सुरक्षितता मिळणार आहे. कोणाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी अशा प्रकारे डोंगराला सेफ्टी नेट बसवण्यात आली आहे. मुख्यमंत्री म्हणून माझी ती जबाबदारी आहे. त्यामुळेच याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. हजारो कुटुंबे याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताची काळजी आम्ही घेणे अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2024 10:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).