Konkan Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

नवीन वर्षाचे सेलिब्रेशनसाठी अनेक पर्यटन कोकणाची वाट धरतात. मात्र कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) आज रात्रीपासून सुरु होणा-या 8 तासांच्या मेगाब्लॉकमुळे हीच वाट प्रवाशांसाठी बिकट होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक आज मध्यरात्री 23.45 मिनिटांनी सुरु होणार असून दुस-या दिवशी पहाटे 7.45 मिनिटांपर्यंत असणार आहे. ऐन सुट्टीच्या मोसमात मेगाब्लॉक आल्याने प्रवाशांची खूपच दैना होणार आहे. कोकणातील निसर्गसौंदर्य, निळेशार समुद्र पाहण्यासाठी अनेक पर्यटक तेथे जातात. त्यात नववर्षाची खरी मजा अनुभवण्यासाठी गोव्याला रेल्वेमार्गे जाणा-या प्रवाशांची या मेगाब्लॉकमुळे तारांबळ उडणार आहे.

आज मध्यरात्री पाऊणे बारा वाजल्यापासून निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान आठ तास वाहतूक बंद राहणार आहे. या दरम्यान धावणाऱ्या दहा गाड्यांच्या वाहतुकीवर मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे. Indian Railway: नवीन वर्षात रेल्वे तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता; प्रवाशांच्या खिशाला बसणार चाप

 या मेगाब्लॉकमुळे मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस, गांधीधाम-नागरकॉइल एक्स्प्रेस, कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेस, दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस, एलटीटी-मडगाव डबलडेकर, कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस, मडगाव-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर या दहा गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकातही अनेक बदल होण्याची चिन्हे आहेत. तरी प्रवाशांनी गोंधळ न करता कोकण रेल्वेला सहकार्य करावे असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

कोरे मार्गावरील बहुतांश गाड्यांची वाहतूक दिवसा होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गाने कमी गाड्या धावतात. त्यात रत्नागिरी ते राजापूर दरम्यान रात्री धावणा-या गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे आडवली येथील काम रात्री करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.