Drone | Representative Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील कारागृहांची (Jail) सुरक्षा वाढवण्यासाठी ड्रोनचा (Drone) वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील 12 कारागृहांवर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी पुण्यातील येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) त्याची सुरुवात झाली. टोळी चकमकी, पोलीस कर्मचार्‍यांवर होणारे हल्ले आणि तुरुंगातील बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आता महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये ड्रोन उडवले जाणार आहेत. एडीजी तुरुंग अमिताभ गुप्ता यांनी पुण्यातील येरवडा कारागृहात ड्रोन उडवून याची सुरुवात केली. तुरुंगातील सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

एडीजी जेल गुप्ता म्हणाले की, ड्रोन ही टेहळणीसाठी प्रभावी यंत्रणा आहे. महाराष्ट्रातील 12 तुरुंगांवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. रात्रीच्या वेळी पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. याद्वारे तुरुंगात काय चालले आहे याची रियल टाइम माहिती उपलब्ध होणार आहे. पायलट प्रोजेक्टमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर कारागृहांचा समावेश करण्यात आला आहे. हेही वाचा Shirdi: साईबाबांच्या चरणी आलेले दान बँकांना मोजणीसाठी वेळ नाही, संस्था आरबीआयजवळ साधणार संवाद

यामध्ये 8 मध्यवर्ती कारागृह, 2 जिल्हा आणि दोन खुल्या कारागृहांचा समावेश आहे. यासह कारागृहातील सुरक्षा बळकट करण्यासाठी ड्रोनचा वापर करणारे महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर देशातील दुसरे राज्य ठरले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील कारागृहात बंदिवानांना बेड आणि उशीची सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ही योजना ठराविक कैद्यांसाठीच आहे. एडीजी जेल अमिताभ गुप्ता यांनी याबाबत सांगितले की, जे कैदी 50 वर्षे किंवा त्याहून अधिक कारागृहात आहेत ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.