सातारा

पुणे आणि मुंबई सारखी शहरे गर्दीने भरलेली असताना, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा सारख्या टियर-टू शहरांमध्ये आयटी आणि इतर उद्योग पार्कची मागणी वाढत आहे. अशात आता सातारकरांसाठी (Satara) सकारात्मक विकासात, सातारा जिल्ह्यात औद्योगिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे, सरकारने आयटी पार्कच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, जी सातारा शहराच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती सातारा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी, कै. छ. प्रतापसिंह महाराज यांच्या स्मृतिदिनी कै. श्री. छ. प्रतापसिंह महाराज उर्फ ​​दादा महाराज ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. उदयनराजे भोसले यांनी ग्रंथालयाचे उद्घाटन केले. माध्यमांशी संवाद साधताना भोसले यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. हुबळी येथील आयटी पार्कबद्दलच्या त्यांच्या अनुभवाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांनी इन्फोसिसच्या सुधा मूर्ती यांच्याशीही चर्चा केली.

ते म्हणाले, पुण्यात जमिनीची उपलब्धता मर्यादित असल्याने, साताऱ्यात आयटी पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र सादर करण्यात आले आहे. याशिवाय, त्यांनी सातारा जिल्ह्यातील जुन्या राजवाड्याच्या देखभालीसाठीही पाठपुरावा केला. ऐतिहासिक वास्तू जतन करण्यासाठी राजवाड्यात संग्रहालय स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. सरकारने यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Media Monitoring Centre: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! Fact-Checking आणि News Analysis करण्यासाठी 10 कोटी रुपयांचे मीडिया मॉनिटरिंग सेंटर स्थापन करणार)

दरम्यान, आयटी पार्क म्हणजे माहिती तंत्रज्ञान उद्योगांसाठी विकसित केलेला विशेष परिसर. येथे आयटी कंपन्या, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाधारित व्यवसायांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. आयटी पार्क स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतात, परदेशी गुंतवणूक आकर्षित करतात आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करतात.