CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये औरंगाबादचे 'संभाजी नगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर आजची मंत्रिमंडळ बैठक फार महत्वाची मानली जात होती. उद्या जर का महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करू शकले नाही, तर आजची मंत्रिमंडळ बैठक ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील शेवटची बैठक ठरेल.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले, ‘आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, तीनही पक्ष एकत्र आले आणि अडीच वर्षांत चांगले काम केले. त्यांनी सर्व पक्षांचे आभार मानले. उद्या विश्वासदर्शक ठराव होईल आणि हा या सरकारचा शेवट आहे की नाही हे ठरवले जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला, पण दुर्दैवाने त्यांना त्यांच्याच पक्षाच्या (शिवसेना) लोकांचा पाठिंबा मिळाला नाही.’

यासह, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाराष्ट्र मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार म्हणाले, ‘आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी, आम्ही त्यांना चांगले सहकार्य केल्याचे सांगितले तसेच भविष्यातही आमच्याकडून अशाच सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते देखील आमच्याशीही असेच वागतील, असेही ते म्हणाले. आमदार सदसद्विवेकबुद्धीने मतदान करतात. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षातील कामाचा प्रत्येक आमदार नक्कीच विचार करेल असे मला वाटते.’ (हेही वाचा: मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेने औरंगाबादचा मुद्दा उचलून धरल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या छावणीत तणाव)

केदार पुढे म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांना यापूर्वी कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता. त्यांनी कोरोनाचा सामना केला. त्यांच्यावर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली. मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर महिन्याभरात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. याबाबत पंतप्रधानांनीही उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले होते. अशा माणसाची फसवणूक होत आहे, ज्याचा जनतेने विचार करावा.’ राजेंद्र शिंगणे म्हणाले, 'बैठकीच्या शेवटच्या 3 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि सांगितले की आम्ही त्यांना सहकार्य केले. काही चूक झाली असेल माफ करा असेही ते म्हणाले.'