इंचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेमुळे येथे शिवसेना, स्वाभीमानी, शिवसेना (UBT), वंचित आणि आवाडे अशी पंचरंगी लढत होणार होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार आवाडे यांच्याशी चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेण्यासाठी राजी केले. आता आवाडे यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने येथील पंचरंगी लढत टळणार आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत स्वतः प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले. प्रकाश आवाडे यांचे बंड थंड करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. (हेही वाचा - Dhairyasheel Mohite Patil: धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्टवादीत प्रवेश, माढ्यातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब)
हातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री रामदास कदम या नेत्यांनी आवाडेंना पुन्हा विनंती केली असता, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. 2019 पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या प्रकाश आवाडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत, भाजपचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले होते.
हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी खासदार राजू शेट्टी स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून लढत आहेत. दरम्यान राजू शेट्टी यांनी महाविका आघाडी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लढण्यास नकार दिल्याने. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार सत्यजीत पाटील सरुडकर यांना संधी देण्यात आली आहे.