Haj Yatra 2019: महाराष्ट्र राज्य हज समिती कडून  यंदा थेट Online Reporting ची सोय;  131 महिला पहिल्यांदाच करणार कुटुंबातील सदस्यांशिवाय यात्रा
Haj Yatra 2019 | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Maharashtra State Haj Committee: मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत धार्मिक आणि प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा करायलाच हवी अशी 'हज' यात्रा यंदापासून महिलांना अधिक सोयीस्कर करण्यात आली आहे. यापूर्वी महिलांसोबत हज यात्रेला रक्ताचे नाते असलेला किमान एक व्यक्ती असणं ही अट आता शिथिल करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, कुटुंबाशिवाय चार महिला एकत्र येऊन हजयात्रा करू शकणार आहेत. राज्य हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी ही माहिती दिली आहे.

TOI च्या वृत्तानुसार यंदा 131 महिला नागपूरमधून हज यात्रेसाठी जाणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हज यात्रेच्या प्रवासाला सुरूवात होणार असून महाराष्ट्रातून 14,995 जण या यात्रेला जाणार आहेत. यंदाच्या वर्षापासून हज यात्रेसाठी सौदी अरेबियाच्या सरकारने भारताला 25 हजारांचा अतिरिक्त कोटा मंजूर केला आहे.

नागपूर व औरंगाबाद येथे हज हाऊस आहेत. हज यात्रेकरूंना प्रवासाच्या दिवशी विमानतळावर येऊन सामानांची तपासणी करावी लागत असे. पण आता दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या सामानाची तपासणी करून मक्का- मदिना येथील त्यांची व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचवले जाणार आहे.

अल-हिज्जाह्‌ या महिन्यामध्ये सौदी अरेबियात मक्का या पवित्र शहरात हज यात्रा भरते. प्रत्येक मुसलमानाने शक्य असेल तेव्हा आयुष्यात किमान एकदा हज यात्रा करावी असे कुराणमध्ये सांगितले आहे.