COVID-19 च्या पार्श्वभूमीवर गोंदियातील 5 वी ते 11 वी पर्यंतच्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद
School | Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना वारंवार प्रशासनाकडून दिल्या जात आहे. एकत्रित ठिकाणी येणे टाळण्यासाठी, सोशल डिस्टंसिंग (Social Distancing) पाळण्यासाठी अशा ठिकाणी जाणे टाळावे असे सांगण्यात येत आहे. दरम्यान गोंदियात (Gondiya) देखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येथील पाचवी ते अकरावीपर्यंतच्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.

गोंदियातील शाळांमध्ये कोरोनाचा प्रवेश झाला असून गोंदियातील 18 शालेय विद्यार्थी आणि 7 शिक्षकांना देखील कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत 5 वी ते 11 वीचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.हेदेखील वाचा- Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 25,681 नवे कोरोना रुग्ण; 70 मृतांची नोंद

ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच शाळांमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. गोंदिया तालुक्यात 11, सडक-अर्जुनी तालुक्यात 2, सालेकसा तालुक्यात 2, अर्जुनी मोरगाव तालुक्यात 1, तिरोडा तालुक्यात 1, आणि गोरेगाव तालुक्यात 1 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.असे एकूण 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यात आजपर्यंत जिल्ह्यात 14 हजार 942 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 14 हजार 392 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 187 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. सध्याच्या घडीला 363 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 266 कोरोनाबाधित रुग्ण हे होम क्वारंटाईन आहेत. तर 97 कोरोना बाधित रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 24 लाख 22 हजार 21 वर पोहोचली आहे.

दरम्यान "राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. मागील सप्टेंबर महिन्यातील उच्चांक कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला आहे. ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीत लॉकडाऊन करणं हा पर्याय आहे. परंतु, लगेचच लॉकडाऊन लावण्यात येणार नाही. आता लोक मास्क वापरु लागले आहेत. लोकांकडून अशाच सहकार्याची मला अपेक्षा आहे. नागरिकांनी नियमांचे  न पालन केल्यास लवकरच कठोर निर्णय घ्यावा लागेल," असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.