Vilaskaka Patil Undalkar Passed Away: महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचे आज निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून उंडाळकर यांच्यावर साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. उंडाळकर यांच्या पार्थिवावर कराड तालुक्यातील उंडाळे गावी आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उंडाळकर यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचं मोठ नुकसान झालं आहे.
विलासकाका उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी झाला होता. उंडाळकर यांचे प्राथमिक शिक्षण उंडाळे गावातचं झाले. त्यानंतर त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण कराडमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. (हेही वाचा - 'नाव बदलल्याने शहरांच्या विकासात फरक पडत नाही', औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर प्रवीण दरेकर यांची भूमिका)
दरम्यान, 1967 ते 1972 काळात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडूण आले होते. विलासकाका यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सलग 35 वर्षे प्रतिनिधित्व केलं. विलासकाका यांनी 1991 ते 1993 मध्ये दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला होता. तसेच 1999 ते 2003 दरम्यान त्यांनी विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री म्हणून धूरा सांभाळल्या. याशिवाय 2003 ते 2004 या वर्षात विलासकाका यांनी सहकार व वस्त्रोद्योगमंत्री पदांची सूत्रे सांभाळली. त्यांनी 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाचा चीन अभ्यास दौरा केला. विलासकाका हे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते होते.
विलासकाका यांनी आपल्या राजकीय काकिर्दित एकूण 12 मंत्री पदांची धुरा सांभाळली. विलासकाका यांनी देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती केली होती. त्यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे विलासकाकांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.