
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षी पासून ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ (Chhatrapati Sambhaji Maharaj Rajya Prerna Geet) दिला जाणार आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar) ठरले आहेत. वीर सावरकरांच्या ‘अनादी मी अनंत मी’… या गीताला पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. दरम्यान ही घोषणा वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.
‘अनादी मी … अनंत मी’मागील प्रेरणा
वीर सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. हा खटला इंग्लंडमध्ये न चालवता भारतात चालवण्यात आला होता. सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने भारतात आणले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी 8 जुलै 1910 या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली. सावरकर 60 यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला, पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या ‘अनादी मी … अनंत मी’होत्या. नक्की वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतील अजरामर झालेली 3 महत्त्वाची गाणी.
प्रेरणा गीत म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताची निवड एकमताने करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक, उपसचिव सांस्कृतिक कार्य, पु. ल देशपांडे कला अकादमी संचालक, दर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य आहेत.