Pune Police | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस संकट काळात नागरिकांना योग्य आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासन सज्ज आहे. परंतु, काही ठिकाणी गैरव्यवहार होत असल्याचे समोर येत आहे. रुग्णांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केल्याने  पुण्यातील संजीवनी अम्ब्युलन्स सर्व्हिसेस (Sanjeevani ambulance services) विरोधात बिबवेवाडी पोलिस स्थानकात (Bibvewadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसद्वारे (Regional Transport Office) या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून या अम्ब्युलन्स सर्व्हिसेस विरोधात आयपीसी कलम 420 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.

कोविड-19 रुग्णाला 7 किलोच्या अंतरावर जाण्यासाठी तब्बल 8000 रुपयांचे बिल लावले. याप्रकरणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या प्रकरणाविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश आरटीओला दिले. या रुग्णाला बिबवेवाडी येथील हॉस्पिटलमधून कर्वेनगर येथील कोविड-19 सेंटर मध्ये जायचे होते. आरटीओ अधिकारी धनंजय गोवासी यांनी बुधवारी या प्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तसंच संबंधित अम्ब्युलन्सही ताब्यात घेण्यात आली आहे.

ANI Tweet:

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे संकट दाट असून मुंबई, पुणे या शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 31704 वर पोहचला असून त्यापैकी 14810 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. तर आतापर्यंत एकूण 962 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य सेवांमधील गैरव्यवहार टाळायला हवेत. त्याचप्रमाणे नागरिकांनही सतर्क राहून गैरव्यवहार, गैरसोय याबद्दल ताबडतोब आवाज उठवायला हवा.