NCP-SP Party Worker Dies of Cardiac Arrest: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) कर्जत-जामखेड (Karjat-Jamkhed) जागेवर भाजपचे प्रा. राम शंकर शिंदे यांचा पराभव करत सलग विजय मिळवला आहे. परंतु, या मतदारसंघातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत रोहित पवार पिछाडीवर असल्याने आणि पवारांच्या पराभवाच्या भीतीने त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमधील जनतेचे आभार मानले. गेली पाच वर्षे कर्जत-जामखेडच्या केलेल्या सेवेचा, इथल्या स्वाभिमानी सामान्य जनतेने टाकलेल्या विश्वासाच आणि तळमळीने काम केलेल्या सर्व निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा हा विजय आहे..! नेते सोबत नसले तरी जनता सोबत असेल तर विजयश्री कुणीही रोखू शकत नाही, त्यादृष्टीनेच या विजयाकडं बघावं लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -Rohit Pawar On Mahayuti Government: राज्यातील महायुती सरकारची आमदार रोहित पवार यांच्याकडून पोलखोल (Watch Video))
विधानसभा निवडणुकीत 10 जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय -
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने 10 जागा जिंकल्या. महायुती आघाडीचा भाग असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या तुलनेत शरद पवार गटाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. शरद पवार यांनी विधासभेसाठी 80 उमेदवार उभे केले होते, त्यात पवार कुटुंबातील दोन सदस्य - युगेंद्र पवार आणि रोहित पवार रिंगणात होते. रोहित पवार यांचा विजय झाला असला तरी युगेंद्र पवार यांचा काका अजित पवार यांच्याकडून पराभव झाला. ( हेही वाचा, Rohit Pawar On BJP: जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवायचे ही भाजपची जुनी सवय; रोहित पवार यांची भाजपवर टीका)