Fact Check: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील पुरातन मूर्ती खरोखरच बदलणार? जाणून घ्या काय आहे वास्तव
कोल्हापूरची अंबाबाई (Photo Credit : Voot)

कोल्हापूरची अंबाबाई (Ambabai), अवघ्या महाराष्ट्राचे दैवत. सध्याची अंबाबाईची पुरातन मूर्ती ही भग्न झाली होती. तिला वज्रलेप देऊन, सुस्थितीत आणण्यात आले होते. मात्र ही मूर्ती बदलण्यात येणार असल्याच्या बातम्या अनेक माध्यमांनी दिल्या होत्या. कोल्हापूरस्थित प्रसिद्ध शिल्पकार अशोक सुतार यांनी तयार केलेली मूर्ती या पुरातन मूर्तीच्या जागी बसवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र यामध्ये काही तथ्य नसल्याचे समोर येत आहे. लोकसत्ताने महालक्ष्मी देवस्थानशी संपर्क साधून या गोष्टीची शहानिशा केली आहे, त्यामध्ये या गोष्टीचा उलगडा झाला.

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी बातचीत झाली. त्यांनी सांगितले, ‘नव्या मूर्तीची पाहणी केली गेली आहे, मात्र जुनी मूर्ती बदलणार नाही. वज्रलेप लावल्यानंतर सध्या ही मूर्ती सुस्थितीत आहे, त्यामुळे ती बदलण्याचा कोणताही मानस नाही. काही मूर्तिकार मूर्ती बनवत होते, ती फक्त पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो.’ या मुद्द्यावर देवस्थान आणि पुजारी यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर येत आहे. (हेही वाचा: महालक्ष्मी मंदिरामधील गरूड मंडपातील खाजगी अभिषेक बंद)

दरम्यान, येत्या काही दिवसांत भग्न झालेल्या मूर्तीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. या पाहणीमध्ये काय निष्कर्ष निघतो तो महत्वाचा आहे. त्यानंतर हे मंदिर आणि ही मूर्ती पुरातन असल्याने ती बदलायची असल्यास देशभरातील पंडितांना बोलावून धर्मसभा पार पडेल, चर्चा होईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. सध्या तरी ही मूर्ती बदलण्याचा कोणताही विचार नाही.

गेले 2-3 वर्षे अंबाबाई मंदिरातील मूर्ती बदलणार असल्याची चर्चा रंगत होती. मूर्ती भग्न झाल्यानंतर त्यात अजूनच भर पडली. त्यात मूर्तीवर होणारे अभिषेक, वर्षानुवर्षे होत असलेली झीज, पार पडत असलेली रासायनिक क्रिया यामुळे कमकुवत झालेली मूर्ती बदलावी असे काही लोकांचे म्हणणे होते. त्याला अनेक भक्तांनी विरोध केला आहे.