कोयना धरण (Photo Credit: Youtube)

सध्या महाराष्ट्र दुष्काळाचा फार मोठ्या प्रमाणावर सामना करत आहे. पुढचे तीनही दिवस तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणत, राज्यातील विजेवरही याचा परिणाम होणार आहे. सध्या राज्यासाठी सर्वात जास्त वीजनिर्मिती सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातून केली जाते. मात्र आजपासून कोयना जलविद्युत प्रकल्पामध्ये वीज तयार करणे पूर्णपणे थांबवले आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात परत भारनियमन सुरु होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या कोयना धरणाची धरणाची क्षमता 105 टीएमसी आहे. यापैकी 67.50 टीएमसी पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जाते. मात्र दुष्काळामुळे धरणातील पाणी कमी झाले आहे. सध्या फक्त 4.34  टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पाण्यापासून वीजनिर्मिती करण्याऐवजी पवनऊर्जा आणि साखर कारखान्यांकडील वीज वापरावर भर देण्यात यावा अशी मागणी केली गेले होती. त्यानुसार आज दुपारी दोन वाजल्यापासून ही वीजनिर्मिती पूर्णपणे थांबवली आहे.

महानिर्मिती कंपनीची वीज निर्मितीची क्षमता 13602 मेगावॅट इतकी आहे. यापैकी 1956 मेगावॉट वीज निर्मिती कोयना जलविद्युत प्रकल्पातून होते. दरम्यान कोयना धरणात कमी होत चाललेली पाण्याची पातळी पाहता वीज निर्मितीसाठी पूर्ण पाणी वापरता येणार नाही याबाबतची सूचना महानिर्मिती कंपनीला पत्राद्वारे देण्यात आली आहे,