Traffic | Pixabay.com

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढी पाडवा (Gudhi Padwa) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डोंबिवली, गिरगाव या भागामध्ये या निमित्ताने शोभायात्रांचे आयोजन केले जाते. डोंबिवली मध्ये श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले जाते.यामध्ये चित्ररथ देखील असतात. यंदाही 30 मार्च दिवशी चैत्रपाडव्या निमित्त फडके रोड वर शोभा यात्रेच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीमध्ये बदल जाहीर करण्यात आले आहेत. सकाळी 4 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत फडके रोड वाहतूकीसाठी बंद ठेवला जाणार आहे.

वाहतूक विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फडके रोड वर वाहतूक बंदची अधिसूचना काढण्यात आली आहे मात्र या काळात अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन वाहने, रुग्णवाहिका, पोलीस वाहनांना या रस्त्यावरून प्रवेश असणार आहे. फडके रोड बंद असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली असल्याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही सांगण्यात आले आहे. स्वागत यात्रेच्या मार्गामध्ये वाहनांचा अडथळा आणि वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

डोंबिवली मधील स्वागतयात्रेचा मार्ग कोणता?

डोंबिवली पश्चिम भागात भागशाळा मैदान, सुभाषचंद्र बोस रस्ता, महात्मा फुले रस्ता, दिनदयाळ रस्ता, कोपर पूल, शिवमंदिर रस्ता, डॉ. राजेंद्रप्रसाद रस्ता, मानपाडा रस्ता आणि फडके रस्ता या मार्गावरून स्वागतयात्रा जाणार आहे.

बंद काय असणार?

फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, मदन ठाकरे चौक, आप्पा दातार चौक रस्ता यावर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक (घारड सर्कल) मार्गे डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्याने ब्राह्मण सभेवरून फडके रोड वर जाण्यासही वाहनांना बंदी असेल. डोंबिवली पश्चिमेकडून कोपर पुलावरून पूर्व भागात जाणाऱ्या वाहनांना बंदी असेल.

पर्यायी मार्गाची व्यवस्था काय?

डोंबिवली पश्चिमेकडून फडके रोड वर येणारी वाहनं स. वा. जोशी शाळा नेहरू रस्ता, व्ही. पी. रस्त्यावरून पुढे जाणार आहेत.कोपर पुलाकडे येणारी वाहने महात्मा फुले रस्ता, रेल्वे मैदान, गणेशनगर भागातून पुढे जातील तर कल्याण डोंबिवली पालिका, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बस राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्त्यावरून पाटणकर चौक, मानपाडा रस्ते पुढे जाऊ शकतील.

दरम्यान शोभायात्रेमध्ये येणार्‍यांसाठी नेहरू मैदान येथे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.