गडचिरोली येथील महिला आणि बाल रूग्णालयातील प्रसुती शस्त्रक्रिया विभागातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान बॅण्डेज पट्टी आणि कापूस पोटातच ठेवून दिल्याची फार मोठी चूक या रुग्णालयाकडून घडली आहे.
गडचिरोली तालुक्यातील कनेरी (टोला) येथील लालनी नैताम यांची मुलगी कांता शर्मा हिला पहिल्या प्रसुतीसाठी गडचिरोलीच्या महिला आणि बाल रूग्णालयात 10 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता दाखल करण्यात आले. यावेळी तब्बल 12 तास कांताकडे रुग्णालयाने दुर्लक्ष केले. त्यानंतर सायंकाळी कांताने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतरही 2 तासांनंतर कांतावर उपचार करून एक साधा टाका मारण्यात आला आला. यावेळी फार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने याबाबत कुटुंबाकडून नर्सला विचारणा करण्यात आली. यावेळी ‘तुम्हाला जमत असेल तर तुम्हीच हे करा’ असे उत्तर देऊन नर्सने कुटुंबियांचा अपमान केला. एव्हढेच नाही तर घरीच प्रसुती का केली नाही, असेही ती पुढे म्हणाली.
त्यानंतर रुग्णालयातून कांताला घरी आणल्यानंतर तिला चालताना, बसताना प्रचंड वेदना व्हायला सुरुवात झाली. यादरम्यान कांता स्वच्छतागृहात गेली असता, बॅन्डेज पट्टी आणि कापूस बाहेर पडले. प्रसुतीनंतर करण्यात आलेल्या उपचारादरम्यान या गोष्टी पोटातच राहिल्याचा धक्कादायक प्रकार यामुळे लक्षात आला. यानंतर गावातल्या आरोग्य सेविका सुनंदा सुपारे यांनी कांताला रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला न देता, आणखी शिल्लक असलेला कापूस आणि बॅन्डेज पट्टी बाहेर काढली व काही औषधे लिहून दिली.
मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कांता व तिच्या आईने या सर्व प्रकार लोकांसमोर मांडला. अजूनही कांताला त्रास होत असल्याने, महिला आणि बाल रूग्णालयाने केलेल्या इतक्या मोठ्या चुकीबाबत संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.