कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी केंद्र सरकारने संसद खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये कपात केली. यावरुन शिवसेना (Shiv Sena मुखपत्र दै. सामना (Daily Saamana) संपादकीयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि पर्यायाने केंद्र सरकारला चिमटा काढला आहे. कोरोनाचे युद्ध जनताच लढणार आहे व जनताच त्यात मरणार आहे. सरकारने आता खासदारांचे वेतन, भत्ते यांत कपात केली हे ठीक, पण परदेशातील काळा पैसा या निमित्ताने थोडा फार परत आला तरी बरे होईल, असे सामना संपादकीयात म्हटले आहे.
केंद्राच्या एकूण महसुलात महाराष्ट्राचा खास करुन मुंबईचा वाटा मोठा आहे. हा महसूल अडीच लाख कोटी रुपये इतका आहे. त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला परत मिळावा. ज्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाचे युद्ध मोदींच्या खांद्याला खांदा लाऊन लढता येईल, असेही या संपादकीयात म्हटले आहे. सोबतच सैन्य पोटावर चालते, साहेब! कोरोनाविरुद्धच्या युद्धात जनताच सैन्य असेल तर तिला उपाशी कसे ठेवायचे? असा सवालही विचारण्यात आला आहे. (हेही वाचा, Coronavirus: 'टाळ्या, थाळ्या आणि दिवे, अशाने युद्ध हरु'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दै. सामना संपादकीयातून टीकास्त्र)
दरम्यान, महाराष्ट्रात ठिकठिकाणी दोन वेळच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था सामान्य कार्यकर्ते करीत आहेत. दाने दाने पर लिखा है खानेवालेका नाम. हे बरोबर पण या संकटसमयी काही लोक 'मास्क'वरही आपली नावे छापून त्याचे वितरण करीत आहेत. महाराष्ट्रातील भाजप महामंडळाने त्यांचा निधी राज्यात नव्हे तर केंद्रात वळवला आहे. त्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीवर विश्वास नाही. राज्यपाल हे महाराष्ट्राचे घटनात्मक प्रमुख. त्यांनी तरी त्यांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत वळवून अंतरंगी भाजपाईंना चपराक द्यायला हवी होती. पण, राज्यपालही दिल्लीच्याच मार्गाने निघाले. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. समजा, महाराष्ट्रात काँग्रेसचे राज्य असते व हे असे अतरंगी वर्तन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी व राज्यपालांनी केले असते तर भाजपने महाराष्ट्रात तांडव केले असते. पण, आई जगदंबा त्यांना लवकरच सद्वर्तनाची, महाराष्ट्रनिष्ठेची सुबुद्धी देईल याबाबत आमच्या मनात तरी शंका नाही, असा विश्वासही सामना संपादकीयातून व्यक्त करण्यात आला आहे.