Coronavirus (Photo Credits: PTI)

सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात खासजी डॉक्टरांच्या (Private Doctors) बाबतीत महाराष्ट्र सरकारने फार महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या खासगी डॉक्टरांना 50 लाखांच्या विम्यात (50 Lakh Insurance) समाविष्ट करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्याच्या आरोग्य सेवा संचालक साधना तायडे यांनी गुरुवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी किंवा निमशासकीय डॉक्टरांना दिले जाणारे विमा संरक्षण आता कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या खाजगी डॉक्टरांनाही दिले जाईल.

9 एप्रिल रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेशी संबंधित पत्राचा संदर्भ देत तायडे यांनी सांगितले की, खासगी डॉक्टरांनाही तीच तरतूद लागू असेल. त्या पत्रात असे म्हटले होते की, कोविड-19 च्या विरोधातील लढ्यात सामील झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा योजना दिली जाणार आहे. याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही याबाबत घोषणा केली होती, ते म्हणाले ‘राज्यात कोरोना स्थितीमध्ये अनेक खासगी डॉक्‍टरांच्याकडून सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने आयएमए यांच्यासोबत चर्चा करून राज्यातल्या सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोना काळात विमा देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.’

यासोबतच, कोरोना मृतदेहांवर शहरी क्षेत्रात अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी 50 लाखाचे विमा कवच मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगताना ग्रामीण भागासाठी 50 लाखाचे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 14,492 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, 326 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,43,289 वर पोहोचली असून 21,359 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.